अडीचशे वर्षापुर्वी अहिल्यादेवींनी प्रतिकुल परिस्थितीत केलेला राज्यकारभार आजच्या राजकारण्यांसाठी आदर्शवत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्या एक महिला असूनही त्यांनी चांगला राज्यकारभार केला.त्या एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला.

अहिल्यादेवींनी न्यायदान प्रक्रिया गतिमान केली. ठिकठिकाणी तलाव बांधले. दुष्काळाचा प्रश्न, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न सोडवणा-या तेजस्विनी अहिल्यादेवींची ३१मे ला २९४ वी जयंती.

अहिल्या-खंडेरावांचा विवाह २० मे १७३३ रोजी झाला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच त्या सासरी निघाल्या. इंदूरला सासरे मल्हारराव आणि सासू गौतमाबाई यांच्या छत्र छायेखाली अहिल्यादेवींची दिनचर्या सुरू झाली.  

मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना राज्यकारभार पाहण्याचे, राजनीती-युद्धांचे डावपेच, युद्धक्षेत्रावरील कामगिरीची ,युद्धनीतीची आखणी कशी करायची,  प्रशासनावर पकड कशी असावी, न्यायदान कसे करावे याचे शिक्षण दिले.  

अहिल्यादेवींच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी ठरली.महेश्वरमध्ये चोर, डाकू यामुळे प्रजा हैराण झाली होती. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जाहीरनामा काढला.

आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल.

त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. चोर – दरोडेखोरांचा बदोबस्त करणा-या यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करून दिला.

अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले.

पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत.

तेव्हा अहिल्यादेवींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.

 मल्हाररावांसोबत खंडेरावही युद्धावर जात असत. त्या वेळी राज्याचा महसूल वसूल करण्याचे, न्याय देण्याचे व धन, सेना, गोळा बारूद, रसद, तोफा, बैल व चाराबंदी इत्यादी कामे अहिल्यादेवीं स्वत: करू लागल्या . एकदा पेशव्यांना काशीला जायचे होते.

त्यांनी अहिल्यादेवींना पत्र लिहिले की,  महेश्वर ते काशी जाण्यापर्यंतच्या रस्त्यातील घाट, नदी व प्रमुख ठिकाणे यांच्या नकाशाबाबत माहिती कळवावी. अहिल्यादेवींनी संबंधित माहिती दूतामार्फत पेशव्यांकडे पाठवून दिली.

पुढे काही काळानंतर अहिल्यादेवींनी श्रीमंत पेशव्यांना पत्र लिहिले होते. त्यात त्या म्हणतात, ‘आम्ही आपल्याशी इमानेइतबारे सेवा केली. मल्हारराव होळकर, पती खंडेराव, मुलगा मालेराव यांनी एकनिष्ठता आपल्या पायाशी वाहिली.

आज राघोबादादा फौज घेऊन तयार आहेत, ते थांबवा.’ परंतु पेशवा राघोबादादा इंदूर राज्यात येऊन पोहोचले होते. अहिल्याबाईंनी तुकोजी होळकर, भोसले, शिंदे, गायकवाड यांना फौजेसह तयार राहण्याचा हुकूम दिला.

इकडे राघोबादादा क्षिप्रा नदीकाठी येऊन थांबले होते. तेव्हा अहिल्याबाईंनी पुन्हा पत्र लिहिले, ‘लढाई आम्हाला नवी नाही, परंतु दोन्ही बाजूंनी आपलेच सैन्य मारले जाईल. मराठी सैन्याचाच पराभव होईल. जर लढाई करायचीच असेल तर मी स्वत: लढाईत नेतृत्व करणार आहे.

मी हरले तरी मला स्त्री म्हणून कोणी हसणार नाही आणि एका स्त्रीला आपण हरवलंत म्हणून आपला नावलौकिकही होणार नाही. परंतु जर या लढाईत आपण हरलात तर मात्र आपणास जगात तोंड दाखवण्या लायक राहणार नाही. दोन्ही बाजूंनी तुमच्या नावाला कलंक लागणार.’ 

राघोबादादांनी पत्र वाचून माघार घेतली.  अडीसशे वर्षापुर्वी अहिल्यादेवींनी प्रतिकुल परिस्थितीत केलेला राज्यकारभार आणि समाजपयोगी कामे  आजही वाखणण्याजोगी असून, आजच्या राजकारण्यांसाठी आदर्शवत आहेत.

Leave a Comment