उदयनराजे भोसले यांना भाजप कडून मोठा झटका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातारा: सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रितच होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा येथे महाजनादेश यात्रेत केली होती.

मात्र, शनिवारी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही निवडणूक एकत्रित होणार नसल्याचे सांगत भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले यांना मोठा झटका दिला आहे.

दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजप प्रवेश करताना लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा एकत्रितच घेणार असेल तर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची अट घातली होती.

त्यांची ही अट मंजूर झाल्यानंतरच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वत:हून घेतला की भाजप नेत्यांच्या सांगण्यानुसार घेतला, याची चर्चा शनिवारी दिवसभर सातारा लोकसभा मतदारसंघात सुरू होती.

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, कमी मताधिक्क्याने झालेला विजय आणि विकासकामांचा मुद्दा तसेच राष्ट्रवादीत माझी पंधरा वर्षे घुसमट होत असल्याचे सांगत ते भाजपवासी झाले होते.

राष्ट्रवादीसाठी हा मोठा झटका होता. त्यातच भाजप प्रवेश करत असताना उदयनराजेंनी भाजपसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकी पहिली अट म्हणजे सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा एकत्रित घेण्यात याव्यात तसेच निवडणुकीत दगाफटका झाला तर राज्यसभा असे पर्याय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आणि नवी दिल्लीत जाऊन भाजपा प्रवेशाचे सोपस्कार पूर्ण केले..

दरम्यान, गेल्या आठवड्यात महाजनादेश यात्रा सातारा जिल्ह्यात होती. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जंगी स्वागत केले होते. यानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अगदी आत्मविश्वासाने काही झाले तरी सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होणार असल्याचे सांगून आत्तापासून कामाला लागा, असे सांगून टाकले होते.

त्यामुळे उदयनराजे समर्थकही खुश होते. आता निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणूक विषयी घोषणा न करुन खासकरुन उदयनराजेंसाठी मोठा झटका दिला.

Leave a Comment