पाण्यात बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी :- पाण्यात बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी मुळा धरणावरील चमोरी गेस्टहाऊससमोर घडली.

नगर शहरातील बोरूडे मळा येथील सातपुते कुटुंब शेजारच्या कुटुंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी रविवारी दुपारी गेले होते. फेरफटका मारल्यानंतर गणेश सातपुते (४३), पूजा गणेश सातपुते (३७) व मुलगा ओंकार (१३) हे तिघे चमोरी गेस्टहाऊससमोर जलाशयाजवळ उभे होते. अचानक ओंकारचा पाय खडकावरून घसरल्याने तो पाण्यात पडला.

मुलगा पाण्यात पडल्याचे दिसताच वडील गणेश यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी टाकली. मात्र, या बाप-लेकाला पोहता येत नसल्याने दोघेही बुडू लागले. आपला पती व मुलगा बुडत असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न करता पूजा यांनी धाडसाने पुढे जात पतीला हात दिला. त्यामुळे त्यांचा प्राण वाचला. पण मुलगा ओंकारला वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

पाण्याची खोली जास्त असल्याने मायलेक बुडाले. पत्नी व मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून गणेश यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. हा आवाज ऐकताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुळानगरचे माजी सरपंच अंकुश बर्डे, आसाराम माळी यांनी धरणात पोहणारे भाऊसाहेब बर्डे, सुनील गजरे, सागर नवरे यांना पाचारण करून पूजा व ओंकार यांचा शोध घेतला. सहा वाजता पूजा यांचा, तर साडेसहा वाजता मुलाचा मृतदेह हाती लागला.

Leave a Comment