मनसेच्या वतीने आयुक्तांना स्मरणपत्र सावेडीतील खड्डेमय रस्ते दुरुस्तीची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहमदनगर – खड्डेमय रस्त्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असताना सावेडी उपनगरातील रस्त्याची दुरुस्तीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती.

अनेक दिवस उलटून देखील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, परेश पुरोहित, अविनाश क्षेत्रे, सुनील धीवर, निलेश खांडरे आदि उपस्थित होते. 

सावेडी उपनगरातील रस्त्याच्या खड्डयांची डागडुजी करून डांबरीकरण होण्यासंदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु आज दोन महिने होऊन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याची अतिशय दैना अवस्था झाली आहे. खड्डयांमुळे गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, पाठ दुखीने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेचे सर्व कर भरुन देखील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या 8 दिवसात या भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी करुन डांबरीकरण न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.