माजी आमदार अनिल राठोडांच्या वाटेत काटे?

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उपनेते अनिल राठोड यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र अचानक शिवसेनेकडून इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली. माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांनी सुरुवातीला सोशल मिडियामध्ये कदम यांच्या उमेदवारीची चर्चा घडवून आणली. त्यावेळी शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली.

कदम यांच्या समवेत राठोड व त्यांच्या समर्थकांची बैठकही झाली. त्यावेळी समर्थकांनी हा प्रकार केल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली. असे असले तरी कदम वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा होतीच. तसेच गेल्या काही दिवसांपासून ते राठोड यांच्यापासून दुरावले असल्याचीही चर्चा होती. शनिवारी अचानक शिवसेनेने पक्ष निरीक्षक म्हणून विलास घुगरे यांना नगरमध्ये पाठविले.

नगरमधील कोणत्याही पदाधिका -याला कल्पना न देता फक्त नगरसेवकांशीच चर्चा करण्याच्या सूचना त्यांना होत्या. त्यानुसार त्यांनी शासकीय विश्रामगृहावर नगरसेवकांना येण्याचे सांगितले. नगर महापालिकेत शिवसेनेचे २४ नगरसेवक आहेत. त्यापैकी महापौर निवडीपासून दुरावलेल्या सारिका भुतकर, परगावी असल्याने सुभाष लोंढे आणि अशोक बडे आजारी असल्याने हे तिघे आपले मत मांडण्यासाठी येऊ शकले नाही.

इतर सर्व २१ नगरसेवकांनी यावेळी उपस्थितीत लावली. विधानसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये आहे, कोणत्या आधारावर उमेदवारी द्यावी आदी प्रश्न यावेळी नगरसेवकांना विचारण्यात आले. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक घुगरे यांनी प्रत्येकाशी बंद खोलीत स्वतंत्र चर्चा केली. त्यांच्यासमवेत आलेले मुंबईचे कार्यकर्ते देखील या चर्चेपासून लांब होते.

अचानक पक्ष निरीक्षक कसे आले, याची चर्चा शिवसेना नगरसेवकांत होती. यातील बहुतांश नगरसेवकांनी विधानसभेसाठी शिवसेनेचे उप नेते अनिल राठोड यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे समजते. मात्र कोणी काय सांगितले, याबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आली होती. तसेच पक्ष निरीक्षकाच्या या दौ -याबाबत पक्षाचे पदाधिकारी अंधारात असल्याचेही लक्षात आले.

शिवसेनेकडून सुरुवातीला राठोड यांच्याशिवाय दुसरे नाव येणार नसल्याची चर्चा होती. मात्र आता माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह महापौर पदासाठी उमेदवारी दिलेले बाळासाहेब बोराटे यांनीही इच्छुक असल्याचे निरीक्षकांना सांगितल्याची चर्चा आहे. काही नगरसेवकांनी यास दुजोरा दिला. मात्र बंद खोलीतील चर्चा गोपनीय असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.