भोजापूर धरण झाले ओव्हर फ्लो

Get real time updates directly on you device, subscribe now.

अकोले – अकोले, संगमनेर व सिन्नर या तालुक्‍यांना सिंचनदृष्ट्या महत्त्वाचे असणारे भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले.त्यामुळे या तीनही तालुक्‍यांतील लाभार्थी क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. भंडारदरा 9.5 व निळवंडे सव्वाचार टीएमसी झाले असून, आढळा 70 टक्के भरले आहे.

ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी पाटात न सोडता, ते नदीपात्रातून संगमनेर तालुक्‍यातील राजापूर पर्यंत पोहचू द्यावे व त्यानंतर पाटात सोडावे, अशी मागणी लाभार्थी गावांनी केली आहे.

तसे न घडल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भोजापूर धरणाची साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट इतकी असून, आज सकाळी दहा वाजता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणाच्या सांडव्यावरून 250 क्‍यूसेकचा विसर्ग म्हाळुंगी नदीपात्रात पडत आहे.

भंडारदरा धरणात आज सायंकाळी नऊ हजार 563 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या धरणात आणखी दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्यानंतर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर केले जाईल. या धरणाची साठवण क्षमता 11.39 टीएमसी इतकी आहे.

धरण दहा हजार 600 दशलक्ष घनफूट झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे घोषित केले जाते. त्यानंतर अधिक जमा होणारे धरणातील पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे हे सर्व पाणी खाली असणाऱ्या निळवंडे धरणात जमा होणार आहे. मात्र समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या बडग्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून दिले जाणार नाही, हे मात्र नक्की.

Get real time updates directly on you device, subscribe now.