शेतकऱ्यांना चार कोटींचा डाळिंब पीकविमा मंजूर

कर्जत :- तालुक्यातील ४३४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटींचा व नगर जिल्ह्यातील ८ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटींचा पीकविमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर झाली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली.

२०१७-१८ या वर्षात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत डाळिंब पिकासाठी पंतप्रधान फळपीक हवामान आधारित विम्याची रक्कम भरली होती. परंतु ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेने एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई याच्याकडे उशिरा भरल्याच्या कारणावरून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा चार कोटींचा डाळिंब पीकविमा कंपनीने नाकारला होता.

याबाबत शेवाळे यांनी जिल्हा बँक व विमा कंपनीकडे पाठपुरावा केला. औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल करत विमा कंपनीच्या विरोधात आवाज उठवला होता. एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत भोसुरे यांच्याकडेही पाठपुरावा करून या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी, म्हणून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

याची गंभीर दखल घेत नगर जिल्ह्यातील आठ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटी रुपयांचा व कर्जत तालुक्यातील बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटी रुपयांचा डाळिंब पिकाचा विमा मंजूर केला. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.