नगर जिल्ह्यात अद्यापही पाणी टंचाई समस्या कायम

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात पावसाने हजेरी लावली.परंतु  दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील 13 लाख 57 हजार 295 जनता पाणी टँकरवर अवलंबून आहे. 

जिल्ह्यातील 487 गावे अणि 2 हजार 847 वाड्या वस्त्यांवर अजूनही 687 पिण्याच्या टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यातील 5 नगरपंचायातींच्या हद्दीत अद्याप पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत.

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. दुष्काळाची तीव्रता इतकी भयानक होती की जिल्ह्यातील चौदापैकी अकरा तालुक्यांमध्ये तीव्र स्वरुपाचा दुष्काळ प्रशासनाने जाहीर केला.

दुष्काळ जाहीर करण्यापूर्वीच काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. दुष्काळी परिस्थिती जाहीर केल्यानंतर तर पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये वाढ होतच गेली. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत.

जिल्ह्यात संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहता, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा हे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले होते.

यांसह पारनेर, जामखेड, पाथर्डी, कर्जत व शेवगाव नगरपंचायत हद्दीत अद्यापही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याचे टँकरची संख्या सर्वाधिक सुमारे आठशेपर्यंत जाऊन पोचली होती. पावसाळा सुरु होऊनही अजून ती कमी झालेली नाही.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक 111, संगमनेर तालुक्यात 8, अकोले तालुक्यात 11, कोपरगाव तालुक्यात 5, नेवासा तालुक्यात 39, राहाता तालुक्यात 18, नगर तालुक्यात 63, पाथर्डी तालुक्यात 75, शेवगाव तालुक्यात 54, कर्जत तालुक्यात 82, जामखेड तालुक्यात 58 व श्रीगोंदा तालुक्यात 72 टँकरद्वारे पिण्याचे पाणी जनतेला वितरित होत आहे.

कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर आता बंद झाले आहेत.  जिल्ह्यात एकूण शासकीय 18 व खाजगी 649, असे एकूण 687 पिण्याच्या पाण्याचे टँकर पाणी वितरित करत आहेत. पारनेर नगरपंचायत हद्दीत 16, जामखेड नगरपंचायत हद्दीत सर्वाधिक 38 पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु आहे.

तर पाथर्डी, कर्जत व शेवगाव नगरपंचायत हद्दीमध्ये सुरु असलेले पिण्याच्या पाण्याचे टँकर आता बंद झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या हळूहळू कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

खेपांची संख्या कमी पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे जनतेला पाणी मिळत असले तरी जिल्ह्यातील बर्‍याच भागामध्ये मंजूर असलेल्या खेपांपैकी प्रत्यक्ष होत असलेल्या टँकरच्या खेपांची संख्या कमी आहे. 11 जुलैच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण 1 हजार 569 टँकरच्या खेपा प्रशासनाने मंजूर केलेल्या आहेत.

मात्र, प्रत्यक्षात 1 हजार 407 खेपा होत आहेत. म्हणजेच जिल्ह्यात तब्बल 162 टँकरच्या खेपा कमी होत आहेत. प्रशासनाने संबंधितांना अहवाल मागवला आहे.

जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावलेली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही पाऊस झालेला असून पाण्याची आवक सुरु झाली आहे.

मात्र, तरीही अद्याप जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या भागात चार्‍याचा प्रश्न मिटला आहे, तेथील शेतकर्‍यांनी आपली जनावरे घरी नेली आहेत.

तर चार्‍याचा प्रश्न कायम असलेल्या भागातील चारा छावण्या सुरुच आहेत. चारा छावण्या 1 ऑगस्टपर्यंत सुरु राहतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.