मी प्रत्यक्ष कामांचे उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही – आमदार राहुल जगताप

नगर :- पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुष्काळी परिस्थिती या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्यामुळे चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना मी केली.

प्रत्यक्ष कामांचे मी उद्घाटन करतो, इतरांसारखी पोकळ आश्वासन देत नाही, असा टोला आमदार राहुल जगताप यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता लगावला.

नगर तालुक्यातील साकत खुर्द येथील सीना नदीवरील केटीवेअर बंधारा दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते बुधवारी झाला. या वेळी ते बोलत होते.

मी प्रत्यक्ष कामांचेच नारळ फोडतो. पोकळ आश्वासने देत नाही. बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांची होती. त्याचे काम सुरू झाले याचा आनंद आहे, असे जगताप म्हणाले.

बंधारा दुरुस्तीचे काम आमदार जगताप यांच्या स्वखर्चाने होत असून याचा फायदा साकतसह परिसरातील अनेक गावांना होणार आहे.

येथील बंधाऱ्यातून मोठया प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यामुळे पाणी टिकत नव्हते.

या कामासाठी सुकाणू समितीने सातत्याने पाठपुरावा केला. दहा-बारा वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.