सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास,श्रीगोंद्यातील महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

श्रीगोंदे :-सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत शेडगाव, (ता. श्रीगोंदे) येथील मंगल दादाभाऊ केदारी या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली. ही व्यथा ऐकून घेण्यास कोणी तयार नसल्याने या त्रासाला कंटाळून उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे केदारी यांनी सांगितले.

लग्नानंतर सासरे भास्कर केदारी, दीर दत्ता केदारी, मार्तंड केदारी व जाव स्वाती केदारी यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. पती दादाभाऊ केदारी यांनी बांधलेल्या घरात आम्ही निवास करत होतो. मात्र, घरावर वरील चौघांनी कब्जा करून ताब्यात घेतल्याने आम्हाला निवारा राहिलेला नाही.

या प्रकरणाची तक्रार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे मंगल केदारी यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, छळ करणाऱ्या या व्यक्तींकडून आम्हा पती-पत्नीच्या जीवितास धोका असून, पोलिस संरक्षण मिळावे व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.