राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण

अहमदनगर :- राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे,तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य मंत्री पदाबाबत ही संभ्रमाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन,

पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे.

भाजप श्रेष्ठी चर्चा केल्यानंतरच विखे पाटलांच्या प्रवेशबाबत निश्चित निर्णय घेतला जाईल. तूर्तास विखे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिला असून राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेस सहमती आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान भाजप प्रवेशा बद्दल बोलतान विखे पाटील म्हणाले ”माझा भाजप प्रवेश कधी होणार, हा निर्णय भाजप पक्षाच्या अध्यक्षांचा असेल,मला मंत्रिपद द्यावे की नाही, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मला कोणती अपेक्षा नाही”

विखे पाटील यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष यांच्याकडे बोट दाखविल्याने एका प्रकारे विखे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडलेला असून दुसरीकडे प्रवेशानंतर मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे विखे यांच्या विधानावरून दिसत आहे.