नगरच्या झोपडपट्टीत राहणारी शुभांगी करणार जागतिक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व

अहमदनगर :- शहरातील संजयनगर  झोपडपट्टीत राहणारी कुमारी शुभांगी राजू भंडारे इंग्लंडमध्ये आयोजण्यात आलेल्या जागतिक वंचित फुटबॉल स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

तिचे वडील वडापाव विकतात तर आई हॉटेलमध्ये चपात्या लाटते. सर्व प्रकारच्या असुविधा आणि गरिबीवर मात करीत शुभांगीने हे यश मिळवले.

आपण  समाधानी नसून भारताच्या फुटबॉल संघात प्रवेश मिळविण्याचे आपले पुढील दोन वर्षातील ध्येय असल्याचे शुभांगीने आज  स्नेहालय परिवाराने आयोजिलेल्या सत्कार सोहळ्यात नमूद केले.

नगरमधील झोपडपट्टीतील  बालकांसाठी मागील अठरा वर्षांपासून बालभवन हा उपक्रम स्नेहालय राबविते. बालकांच्या  शैक्षणिक ,मानसिक  विकासासाठी आणि चारित्र्य निर्माणासाठी २ हजार बालकांसोबत बालभवन कार्यरत आहे.

स्नेहालयची ‘सत्यमेव जयते फुटबॉल अकादमी’  ही सर्व सेवावस्तीतील (झोपडपट्ट्या तील)  बालकां साठी सुरू केलेली अभिनव क्रीडा प्रबोधिनी आहे ‌. शुभांगीने आपल्या यशाचे श्रेय स्नेहालय संस्था आणि या क्रीडा प्रबोधिनीला दिले.

वयाच्या चौथ्या वर्षापासूनच शुभांगी संजयनगर बालभवन प्रकल्पाशी जोडली गेली . स्नेहालय बालभवनची ती  विद्यार्थिनी आहे.

तिच्या क्षमता हेरून बालभवनचे सहसंचालक हनिफ शेख , ‘सत्यमेव जयते फुटबॉल अकादमीचे’ प्रशिक्षक राहुल वैराळ आणि नीलेश वैरागर यांनी शुभांगीला प्रेरीत केले. ७  वर्षांच्या मेहनतीनंतर सध्या शुभांगी याच उपक्रमात प्रशिक्षक म्हणून रुजू झाली.  

जागतिक स्लम साँकर (फुटबॉल) स्पर्धेत भारतीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी शुभांगीने मागील तीन वर्षांपासून अफाट मेहनत घेतली.तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने स्वतःला सिद्ध करून दाखवले .

अखेरीस मागील आठवड्यात कु.शुभांगी  हिची भारताच्या महिला फुटबॉल संघामध्ये “होमलेस वर्ल्ड कप-2019” खेळण्यासाठी निवड झाली .

येत्या १ ते २०  जुलै २०१९  या काळात  तिचा अंतिम प्रशिक्षण कॅम्प नागपूर येथे  होणार आहे. २१  जुलै २०१९   रोजी भारताचा फुटबॉल संघ मुंबई येथून एडिनबरो, (स्कॉटलंड ) साठी रवाना होणार आहे. 

इंग्लंड मधील कार्डिफ आणि  वेल्स, याठिकाणी दिनांक २७  जुलै ते ३  ऑगस्ट रोजी  “वर्ल्ड कप – 2019”  मध्ये भारताचां संघ खेळणार आहे.

शुभांगी सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात कला शाखेत शिकते . तिचे वडील राजू पुणे बस स्थानकात वडा- पाव विकून चरितार्थ चालवितात.

शुभांगीची आई सौ. प्रीती हॉटेलमध्ये चपाती लाटण्याचे काम करते. तिला एक भाऊ व दोन बहिणी आहेत.

पुढील आयुष्यात नगरच्या सर्व झोपडपट्ट्यात  फुटबॉलची टीम सुरू करण्याची आणि स्पर्धा परीक्षा देऊन IPS (पोलीस अधिकारी) होण्याची शुभांगीची जिद्द तिने व्यक्त केली.

शुभांगीने मिळवलेल्या यशाबद्दल स्नेहालय परिवाराने शुभांगी चा  सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

बाल भवन प्रकल्पाचे मानद  संचालक संजय बंदिश्टी, संचालिका शबाना शेख, स्नेहालयचे सुवालाल शिंगवी, राजीव गुजर, संजय हरकचंद  गुगळे ,अनिल गावडे,प्रवीण मुत्याल, विष्णू कांबळे, जयश्री शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या सर्व दौर्‍यात व्यक्तिगत खर्चासाठी शुभांगीला अर्थसहाय्याची आवश्यकता आहे. तिला मदत करू इच्छिणाऱ्यांनी 9011026498 येथे संपर्काचे आवाहन बाल भवन प्रकल्पाने केले आहे.