आमदार शिवाजी कर्डिले कुणाला टोपी घालणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- नगर लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार, दि. २३ रोजी होणा-या मतदनाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

दुसरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेवटच्या दोन दिवशी पक्षाचेच काम केले की जावई राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे काम केले, यावरच बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहे.

नेमकी कुणाला टोपी घालणार यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर विखे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर मतदारसंघात तब्बल तीन सभा घेवून कार्यकर्त्यांना जाहीर सभेतून मार्गदर्शन केले.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील इतर मंत्री हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारास येऊन त्यांनी जाहीर सभा घेतल्या.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ . जयंत पाटील , महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते नगरला येऊन गेले.

भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी नगरची जागा अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही पक्षांनी आत्तापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. परंतु स्पष्टपणे कुणाचेही पारडे जड वाटत नाही.

दोन्ही नेत्यांना घाम फुटला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विखे यांना तोंड देण्यासाठी शरद पवार यांनी कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कर्डिलेंची पुरती पंचाईत झाली आहे. ते पक्षाच्या सभा व काही व्यासपीठावर दिसत आहेत.

मात्र ते निवडणुकीत भाजपचे मनापासून काम करतात का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते जावई आ. संग्राम जगताप यांचे काम करताहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ते सध्या तरी दोन्ही डगरीवर पाय देऊन आहेत. ते ती जाहीर सभा, बैठका आदींमधून पक्षाच्या कितीही गप्पा मारत असले, तरी आतून मात्र त्यांचा जावई संग्राम यांना सॉफ्ट कॉर्नर असल्याचे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत कर्डिले ही नेमकी कुणाला टोपी घालतात, यावर बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. आ. कर्डिले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्यासाठी उभी केली, तर जगताप यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.

परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या नेत्यांच्या दबावापुढे त्यांनी पक्षाचे काम केले, तर संग्राम जगताप यांची विकेट पडू शकते.

त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अनेकांचे कर्डिले यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment