‘त्या’ पेड न्यूजप्रकरणी सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर :- एका स्थानिक लोकल केबल नेटवर्कवर डॉ. सुजय विखे होणार केंद्रात मंत्री’ या आशयाची एकांगी, एकाच उमेदवाराला लाभ होईल आणि एकच उमेदवार जिंकेल, अशी शक्यता वर्तविणारी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती.

त्याचा खुलासा विखे यांनी शनिवारी सादर केला आहे. तसेच या वृत्ताचा खर्च आपल्या खर्चात समाविष्ट न करण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्या न्यूज नेटवर्कवर बातमी प्रसारित करण्यास आपली अनुमती नव्हती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पुढे पेड न्यूजच्या संदर्भातील नियम उमेदवारांना लागू होतात. तसेच आपण दोन वर्तमानपत्रांमध्ये जाहीर प्रकटन दिले होते. आपल्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य कोणत्याही नागरिकाने किंवा मतदाराने करु नये, असे आवाहन केले होते.

असे कृत्य कोणी केले, तर त्याला मी जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे या बातमीला आपली अनुमती नव्हती, असा पुनरुच्चार विखे यांनी केला आहे. तसेच ही बातमी पेड न्यूज म्हणून आपल्या निवडणूक खर्चात समाविष्ट करु नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.

विखे यांना शुक्रवारी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने नोटिस बजावली होती. या समितीच्या माध्यमातून वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या व वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एकाच स्वरुपाच्या, एकांगी आणि एकाच उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडावा, या अनुषंगाने आलेल्या बातम्या पेड न्यूज म्हणून मानल्या जातात.

त्याच अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती काम करते. दरम्यान, या समितीने विखेंच्या बातमीसंदर्भात ज्या केबल नेटवर्कला देखील नोटिस दिलेली आहे, त्यांनी अद्याप आपला खुलासा सादर केलेला नाही.