प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू

नेवासे :- लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील मतदान कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचारी अर्जुन रघुनाथ शिंदे (राहणार भेंडे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

या घटनेने नेवासे तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यात २६९ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी नियुक्त १४९९ कर्मचाऱ्यांना गुरूवारी पहिले प्रशिक्षण देण्यात आले.

नेवासे शहराबाहेर असलेल्या रामलीला मंगल कार्यालयात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तेथे तपशीलवार माहिती दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना दुपारी तीननंतर ज्ञानोदय हायस्कूलमध्ये प्रात्यक्षिकासाठी नेण्यात आले.

अर्जुन रघुनाथ शिंदे यांना साडेतीन वाजता छातीत दुखायला लागले. सहकारी किशोर देशमुख यांना त्यांनी याबाबत सांगितले. त्यानंतर शिंदे यांना लगेच श्वास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.