सुजय विखेंसाठी मत मागणाऱ्या त्या तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ !

अहमदनगर :- लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.

लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोज विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली हाेती.

निघोज येथील निवृत्त पोष्टमास्तर अल्लाउददीन शेख यांचा बीएसस्सी फिजिक्स, एमबीए शिक्षण झालेला मुलगा फिरोज याचा विवाह हसनापूर (ता. राहता) येथील रहेमान पठाण यांची मुलगी मोसिना हिच्याशी ३१ मार्च रोजी डॉ. सुजय विखे यांचे गाव असलेल्या प्रवरानगर येथे पार पडला.

या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ”किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजयदादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ असे अवाहन करण्यात आले होते.

या पत्रिकेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. विखेे समर्थकांनीही सोशल मीडियावर फिरोजची पत्रिका अपलोड करून डॉ. विखे यांच्यावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

फिरोज याचे हे कृत्य आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. पत्रिका ताब्यात घेण्यात येऊन शान मोहंमद शेख यांनी गुरुवारी पहाटे फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला होता.

728 X90 Jeep Car