अहमदनगर भाजपा कार्यालयाला जागा मिळेना !

अहमदनगर :- सत्तेवर असलेल्या भाजपच्या जिल्हा ग्रामीण कार्यालयासाठी गेल्या पाच वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे.

काही जागा पाहून झाल्या, मात्र पक्षाकडे आर्थिक बजेट नसल्याने हे व्यवहार फिसटकले. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांवर कुणी पक्ष कार्यालयासाठी जागा देता का जागा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नगरमध्ये गांधी मैदान येथे पक्षाचे कार्यालय आहे. या पक्षाची कार्यालयाची चावी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या गटाकडे आहे. मात्र गेल्या काही वर्षांंत या कार्यालयात पक्षाच्या बैठका झाल्याच नाहीत.

ज्या बैठका झाल्या त्या सर्व खासदार दिलीप गांधी यांचे निवासस्थान व कार्यालयात झाल्या. विशेष म्हणजे नगरमध्ये पक्षाचे आलेले सर्व नेते, मंत्री हे खासदार दिलीप गांधी यांच्याकडेच जात असत.

आता ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षाचे गांधी मैदानावरील कार्यालय व गांधी यांच्या निवासस्थानामागे असलेले कार्यालय हे बंद झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या वि‌शेषत: कर्जत-जामखेडमधील कार्यकर्त्यांना पालकमंत्री राम शिंदे यांचे प्रेमदान चौकातील कार्यालय आहे. मात्र ग्रामीण भागातील उर्वरित कार्यकर्त्यांसाठी कार्यालयच नाही.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून काँग्रेसमधून आलेले डॉ.सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने गांधी यांच्या निवासस्थानाशेजारी असलेले कार्यालय बंद झाले आहे.