शिर्डीत खा.सदाशिव लोखंडेच सेनेचे उमेदवार !

मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर

कोपरगाव :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीविषयी मातोश्रीवर झालेल्या चर्चेत खासदार सदाशिव लोखंडे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

लोखंडे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. बैठकीच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोणाही शिवसैनिकाने संभ्रमावस्था न ठेवण्याचे आवाहन केले.

भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होती. युती झाल्यामुळे जागा सेनेकडे असल्याने भाजपतून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याची खात्री नव्हती.

त्यामुळे ते दोन्हीकडे संपर्क ठेवून होते. गतनिवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे यांना पक्षाने तिकीट दिले दिले होते. मात्र, त्यांनी ते आयत्यावेळी नाकारले आणि काँग्रेसची वाट धरली.

गेल्या साडेचार वर्षांतील लोखंडेंच्या कामाचा आलेख पाहता खासदार म्हणून त्यांनी चांगले काम केले. वर्षातील दोनशे दिवस अधिवेशन व इतर कामकाजात जातात, ही वस्तुस्थिती असताना केवळ संपर्क नाही म्हणून त्यांना उमेदवारी नाकारणे चुकीचे ठरेल.

त्यामुळे मनात कोणताही किंतू न ठेवता शिर्डीतून लोखंडे यांनाच पुन्हा लोकसभेत पाठवण्याच्या तयारीला लागा, असे आदेश मातोश्रीने दिल्यामुळे मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.

728 X90 Jeep Car