लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नगरकरांना उड्डाणपूलाचे ‘गाजर’ !

खा.दिलीप गांधींकडून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न.

अहमदनगर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात यापूर्वी तीन वेळा भूमिपूजन झालेल्या नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा पुन्हा घाट घालण्यात आला आहे.

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनासाठी शुक्रवार (८ मार्च) चा मुहूर्त शोधला आहे.

केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांत देशभरात लागू होणार असल्याने ती सुरू होण्यापूर्वी दोन्ही भाजपच्या अनेक संकल्पित विकासकामांची भूमिपूजने व उद्घाटने देशभर सुरू आहेत.

नगरच्याही पुलाचे भूमिपूजन शुक्रवारी होणार आहे. पुलाची निविदा अंतिम होऊन कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत होऊन

प्रत्यक्षात या महिनाखेरीपर्यंत पूल उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याचा विश्वास खासदार गांधी यांनी व्यक्त केला आहे.

उड्डाणपूल कामांच्या निविदा दिल्लीत उघडण्यात आल्या असल्या तरी त्या अंतिम होऊन प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश मात्र अद्याप मिळालेला नाही.

इतिहास नगरच्या उड्डाणपूलाचा…

राज्यात दोन्ही काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शिरूर-नगर रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. या कामातच स्टेशन रोडवर सक्कर चौक ते सथ्था कॉलनीदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित होते.

तेव्हा १३ कोटींच्या या कामाचे २०१० मध्ये तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले होते.

त्यानंतर पुलाचे काम करणाऱ्या कामगारांना झालेली मारहाण तसेच पुलासाठीच्या भूसंपादनास महसूल विभागाकडून झालेला उशीर व अन्य काही कारणाने संबंधित चेतक एंटरप्राईजेस ठेकेदाराने पूल उभारण्यास असमर्थता व्यक्त केली.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे पूल उभारण्याची घोषणा तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली होती व राज्याच्या अर्थसंकल्पात या पुलासाठी ८४ कोटींचा निधीही प्रस्तावित केला होता.

त्यानंतर त्यांच्या हस्तेही या पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले. पण दोन्ही भूमिपूजने होऊनही प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू झालेलेच नाही. आता तिसऱ्यांदा पुलाच्या भूमिपूजनाचे नियोजन राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपने केले आहे.

728 X90 Jeep Car