राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी !

भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली

अहमदनगर :- राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असतानाही, मनपा सभापती निवडणुकीत मात्र दोघांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली.

‘स्थायी’ सभापती निवडीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात बसपला मतदान केले. राष्ट्रवादी बडतर्फ गटाने अर्ज माघारी घेत बसपला साथ दिली. बसपचे मुदस्सर शेख यांनी शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांचा पराभव करीत सभापतीपदावर कब्जा केला.

महिला- बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपच्या लता शेळके बिनविरोध निवडूणआल्या.उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली असताना, नगरमध्ये युतीत बिघाडी असल्याचे स्पष्ट झाले. सभापती निवडणुकीत भाजपशी युती होण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न झाले.

जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी खा. दिलीप गांधी यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा केली होती. मात्र, युतीची चर्चा निर्णायक वळणावर आलीच नाही. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला ‘कात्रज’चा घाट दाखवत बसपचे मुदस्सर शेख यांना मतदान केले.

संख्याबळाच्या दृष्टीने तिसर्‍या स्थानी असणार्‍या भाजपने शिवसेनेला दूर ठेेवत बसप व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौर व उपमहापौरपद मिळविले आहे.

मात्र, राज्यात युती झाल्याने मनपा सभापती निवडणुकीत युती होईल का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, नगरमध्ये शिवसेना व भाजप एकमेकांचे विरोधक असल्याचे स्पष्ट झाले आहे.