अपघातात पोलिस निरीक्षकासह पत्नीचा मृत्यू.

श्रीगोंदे :- पुण्यात राहणाऱ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेले धारूर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता (वय ४०) यांचा नगर-पुणे रोडवर गव्हाणवाडी येथे झालेल्या कारच्या अपघातात मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. अनिलकुमार जाधव हे सध्या धारूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांची ऐश्वर्या नावाची मुलगी पुण्यात यूपीएससीची तयारी करीत आहे. तसेच त्या एका शाळेवर शिक्षिकाही आहेत.

ऐश्वर्याचा वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी जाधव हे पत्नी सुजाता यांच्यासह कारने (एमएच १० – ८८८९) पुण्याला जात होते. नगर-पुणे महामार्गावर बेलवडी, ता. श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गव्हाणवाडीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला.

उभा असलेल्या कंटेनरला कार धडकून रस्त्याच्या खाली गेल्याने हा अपघात झाल्याचे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आले. जाधव हे स्वत: कार चालवत होते, तर पत्नी या बाजूला बसलेल्या होत्या. कार डाव्या बाजूला पलटल्याने त्यामध्ये अडकल्या.

हा अपघात झाल्याची माहिती समजताच बाजूच्या लोकांनी धाव घेत दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी नेत असतानाच सुजाता जाधव यांची प्राणज्योत मालवली. तर अनिलकुमार जाधव यांच्यावर पुण्यातील खराडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचे निधन झाले.

728 X90 Jeep Car