निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍याच्‍या कामास निधी कमी पडू दिला जाणार नाही

– जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आश्वासन.

अहमदगर :-  राहुरी तालुक्‍यातील वडनेर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उर्ध्‍व प्रवरा निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍यांच्‍या कामाचे भूमीपूजन करुन शुभारंभ करण्‍यात आला. या कालव्‍याच्‍या कामासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्‍हणाले.

या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्‍ट्र राज्‍याचे मृद व जलसंधारण, राजशिष्‍टाचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याण मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम,  आदि मान्‍यवर उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री महाजन म्‍हणाले, राज्‍यामध्‍ये जे जुने प्रकल्‍प अर्धवट अवस्‍थेत आहेत. सर्वप्रथम ते पूर्ण करण्‍यात येतील. राहुरी तालुक्यातील वडनेर येथील निळवंडे उजवा प्रकल्‍पाचे काम दिलेल्‍या मुदतीत पूर्ण करण्‍यात येईल. त्‍यास लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही.

शासन शेतक-यांना केंद्र बिंदू मानून त्‍यांच्‍या हिताचे निर्णय घेत आहे. शेतक-यांनी पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून न राहाता उपलब्‍ध पाणी सुक्ष्‍म सिंचन, ठिबक सिंचन अशा प्रकारच्‍या योजना राबवून पाणीचे बचत करुन योग्‍य प्रकारे नियोजन करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, राज्‍य शासन शेतक-यांसाठी विविध प्रकारच्‍या योजना राबवत असून त्‍यांचा लाभ शेतक-यांनी घ्‍यावा. शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीच्‍या यांच्‍या हस्‍ते देशात सर्व ठिकाणी सुरु झाला आहे.

निळवंडे धरण उजव्‍या कालव्‍याचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावून त्‍यास कोणत्‍याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही असे आश्‍वासन यावेळी दिले. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्‍या हस्‍ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पाच लाभार्थी शेतक-यांचा सत्‍कार करण्‍यात आला. खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले व प्रास्‍ताविक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती अ.ह. अहिरराव यांनी केले.

728 X90 Jeep Car