उसाच्या ट्रकखाली दबून मामा-भाच्याचा मृत्यू.

अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल.

राहुरी :- तालुक्यातील वांबोरी येथील पांढरीपुल रस्त्यावरील डाक बंगल्याजवळ शनिवारी रात्री उसाचा ट्रक पलटी होऊन त्याच्याखाली दबून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला.

बाबासाहेब बाजीराव ससे (वय ४५) व रवींद्र तुकाराम उर्फ बाळासाहेब दांगट (वय ३०, दोघे रा. कात्रड, ता. राहुरी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. याबाबत वांबोरी दूरक्षेत्र येथे दीपक तुकाराम ऊर्फ बाळासाहेब दांगट यांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बाबासाहेब ससे व रविंद्र दांगट हे दोघे वांबोरीच्या राजु ओस्तवाल यांच्या शेतातील पाण्याची पाईपलाईनच्या खालून रोड क्रॉसिंगच्या कामासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यातून माती काढत होते.

त्याचवेळी पांढरीपुलाकडून वांबोरीच्या दिशेने भरधाव येणारा उसाचा ट्रक माती काढणाऱ्या ससे व दांगट यांच्या दिशेने येत पलटी होऊन दोघेही उसाखाली दाबले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर दीपक गांधले, नितीन कुसमुडे, कात्रडचे उपसरपंच शरद दांगट यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी जेसीबी यंत्राच्या साह्याने ऊस बाजूला काढून उसाखालील दबलेले बाबासाहेब ससे व रवींद्र दांगट यांना बाहेर काढले.

व तातडीने वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर चालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला.

728 X90 Jeep Car