मुलगा ट्रॅक्टरच्या खाली आल्याने मृत्यू,उसतोडणी मजुरांकडून ड्रायव्हर तरुणाची हत्या !

श्रीरामपूर तालुक्यातील घटनेने परिसरात खळबळ.

श्रीरामपूर :- ऊसतोडणी कामगारांच्या टोळीतील एक लहान मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

त्यानंतर संतप्त ऊसतोडणी कामगारांनी लाकडी दांडके व कोयत्याने केलेल्या मारहाणीत गावातीलच असणारा चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरच्या उक्कलगावात घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील दरंदले वस्तीनजीक कडबा कुट्टी करणारा रिकामा ट्रॅक्टर चालला होता.

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ऊस तोडणी कामगाराच्या सोहम कन्हैयालाल मोरे या 3 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला.

जळकेवाडीकडून कुट्टी करून ट्रॅक्टरला जोडलेले कुट्टी मशीन घेऊन अक्षय बाळासाहेब थोरात हा तरुण आपल्या घराकडे चालला असता पटेलवाडी जवळील दरंदले वस्तीनजीक आला.

ऊसतोडणी कामगारांच्या अड्ड्यावरील ऊसतोडणी कामगार कन्हैय्यालाल बापू मोरे यांचे 6 ते 7 वर्ष वयाचे चिमुरडे मूल ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागेवरच गतप्राण झाल्याने अड्ड्यावरील इतर तोडणी कामगारांनी आरडाओरडा करत ट्रॅक्टरकडे धाव घेतली.

महिलांचा आक्रोश सुरू झाला.अशातच अक्षय बाळासाहेब थोरात हा जिवाच्या आकांताने वस्तीच्या दिशेने सैरावैरा पळत असतानाच संतप्त तोडणी कामगारांनी हातात लाकडी दांडके व कोयते घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला.

घटनास्थळापासून त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्याठिकाणी रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. स्थानीक ग्रामस्थांनी मयत अक्षयला तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान घटनेची माहिती कळताच मयत अक्षयच्या नातेवाईकांसह स्थानीक ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठले. पोलीस व स्थानिकांचा जमाव बघून तोडणी कामगारांनी पलायन केले.

दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून काही तोडणी कामगारांना ताब्यात घेत मृत चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविला.

पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून आलेल्या तोडणी कामगारांचा मुलगा गेला.

तर अक्षय बाळासाहेब थोरात या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील तरुणालाही प्राणघातक हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्याने नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

728 X90 Jeep Car