९५ लाख मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यावर गुन्हा.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रोहिदास देशमुख यांनी दिली फिर्याद .

पारनेर :- अतिक्रमण काढण्यासाठी तब्बल ९५ लाख मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पोपट माळी यांच्याविरोधात खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ, तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखवल्याचा गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील रोहिदास भास्कर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख यांची वनकुटे येथे गट क्रमांक ८५ मध्ये १९ एकर जमीन आहे.

१ नोव्हेंबर २०१८ रोजी वनकुटे येथील रहिवासी दगडू दुर्योधन केदारी, त्याचा मुलगा, तसेच जामगाव येथील बाळासाहेब पोपट माळी यांनी देशमुख यांच्या शेतात बेकायदेशीररित्या टपरी आणून टाकली.

टपरी का टाकली, याबाबत बाळासाहेब माळी, दगडू केदारी व त्याच्या मुलाकडे देशमुख यांनी विचारणा केली असता दगडू केदारी व इतरांकडून जनरल मुखत्यारपत्र करून शेतजमीन घेतल्याचे बाळासाहेब माळी व बाळासाहेब हिलाळ यांनी सांगितले.

प्रांताधिकाऱ्यांकडील निकाल तुमच्या विरोधात गेला आहे. तुम्हाला या क्षेत्रात वहिवाट करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही, असेही सांगण्यात आले.प्रांताधिकाऱ्यांच्या निकालास मी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थगिती मिळवली असल्याचे देशमुख यांनी माळी, हिलाळ, तसेच केदारी यांना सांगितले.

मात्र, त्यानंतर २२ नोव्हेंबरला देशमुख यांनी बाळासाहेब माळी, दगडू केदारी, तसेच बाळू हिलाळ यांच्याशी चर्चा केली असता एकरी ५ लाख याप्रमाणे १९ एकरांसाठी तब्बल ९५ लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली.

पैसे न दिल्यास परिणाम वाईट होतील. तुम्हाला शेतात येऊ देणार नाही. जर शेतात आलात, तर तुमचे हात पाय मोडून टाकू असा दमही देण्यात आला. ३०-४० गुंड आणून देशमुख व त्यांच्या शेतामधील मजुरांना धक्काबुक्की करत शेतातून हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२ डिसेंबरला देशमुख शेतावर गेले असता तेथे ७-८ महिला, तसेच २०-२१ गुंंड आले. देशमुख यांना राहत्या घरातून हुसकावून लावण्यात आले. आम्हाला पैसे न दिल्यास डाळिंबाचे पीक उद््ध्वस्त करू, अशी धमकीही देण्यात आली.

५०-६० माणसांना आणून शेतातील डाळिंबाची फळे तोडण्यात आली. त्यांना विचारणा करण्यात आली असता तू हायकोर्टातून स्टे आण किंवा कोठूनही आण. आम्ही कायद्याला जुमानत नाही. पोलिस डिपार्टमेंट आम्ही खिशात घेऊन फिरतो. मी स्वतः इंटरनॅशनल पोलिस आहे. स्थानिक पोलिसांना जुमानत नाही.

जर येथे कोणी आले, तर सर्वांचे खून करेन. गावठी कट्टा रोखून १९ एकरांवरील अंदाजे १५ ते २० लाख रूपयांचे डाळिंब तोडून ते एमएच १६ सी. सी. ३०८८ व विनाक्रमांकाच्या वाहनातून नेण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

728 X90 Jeep Car