आता ‘या’ नेत्याला लढवायचीय नगर दक्षिण लोकसभा…

राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुकांची संख्याही वाढली.

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ दोन्ही काँग्रेसच्या दृष्टीने हळूहळू प्रतिष्ठेचा होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

काँग्रेसने डॉ. सुजय विखेंसाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मागितला आहे, पण राष्ट्रवादीने स्पष्ट नकार दिल्याने काँग्रेसला ही जागा सोडण्याची राष्ट्रवादीची इच्छा नसल्याचे दिसू लागले आहे.

या पार्श्वभूमीवर पक्षाकडून लढण्यास इच्छुकांची संख्याही वाढू लागली आहे. सुरुवातीला असलेले आमदार अरुण जगतापांचे नाव आता मागे पडले असून

त्यांना पर्याय म्हणून माजी आमदार दादा कळमकर व नरेंद्र घुले, तसेच प्रताप ढाकणे या तीन नावांवर चर्चा सुरू असताना आता नव्याने माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे व डॉ. अनिल आठरे ही दोन नावे पुढे आली आहेत.

माजी खासदार चंद्रभान आठरे यांचे पुतणे व येथील आठरे पब्लिक स्कूलचे सर्वेसर्वा डॉ. अनिल सूर्यभान आठरे यांनीही नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानेच राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या समर्थकांच्या छोटेखानी बैठकीत संमिश्र भावना व्यक्त झाल्या. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, तर लढण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले गेले.

728 X90 Jeep Car