तब्बल 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा !

शौचालयाच्या अनुदानाची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी !

श्रीरामपूर :- शौचालयाचे बांधकाम न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहरातील सुमारे 423 नागरिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2015 पासून श्रीरामपूर पालिका हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने शासनाची वैयक्तीक शौचालय योजना संपूर्ण राज्यात राबविली जात आहे.

तेव्हापासून आजपर्यंत नागरिकांनी केलेल्या अर्जापैकी 3314 पात्र लाभार्थ्यांना त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर सहा हजार रुपये अनुदानाचा हप्ता जमा करण्यात आले होते.

पैसे जमा झाल्यानंतर या लाभार्थ्यांनी तातडीने शौचालयाचे काम सुरु करुन पालिकेच्या आरोग्य विभागाला तीन महिन्यांच्या कालावधीत कळविणे बंधनकारक होते.

मात्र यातील 423 लाभार्थ्यांनी आतापर्यंत अनुदानाची रक्कम मिळूनही शौचालयाचे बांधकाम सुरु केलेले नाही. त्यांना वेळोवेळी पालिकेच्या सुपरवायझरांनी शौचालयाचे बांधकाम सुरु करा, अन्यथा घेतलेले अनुदान पुन्हा शासन जमा करा अशा सूचना दिल्या होत्या.

तरीही त्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम करण्यास टाळाटाळ करुन प्रशासनाकडून घेतलेली प्रत्येकी 6 हजार रुपयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली आहे.

अखेर याप्रकरणी पालिका कर्मचारी राहुल प्रकाश खलिपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या 423 नागरिकांनविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

728 X90 Jeep Car