आ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मागील काही दिवसांपासून करत आहेत. त्याची परिणीती रविवारी गुन्हा नोंदवण्यात झाली.

आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीच्या वाटेवर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अजित पवार आणि आमदार मुरकुटे यांची पुण्यात गुप्त बैठक अशी बातमी व घुले हे आमदार मुरकुटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत असल्याचा फोटो व्हायरल झाला.

सोशल मीडियावर हा मजकूर टाकणाऱ्या तिघांविरुद्ध मुरकुटे यांचे स्वीय सहायक सुनील बाळासाहेब मोरे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खोटा व बदनामीचा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील मोरे यांना त्यांच्या मोबाइलवर यश दरंदले, महेश उगले, सुनील जाधव यांनी वेगवेगळ्या फेसबुक पेजवर व Whatsapp ग्रुपवर प्रसिद्ध केलेला हा मजकूर आढळला. त्यांनी लगेच नेवासे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून आमदार मुरकुटे यांची बदनामी केल्याने कायदेशीर कारवाई व्हावी, असे मोरे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Leave a Comment