सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगर येथे झाला स्त्री शक्तीचा जागर

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. बॅण्ड पथकाच्या निनादात निघालेल्या रॅलीत फेटे परिधान करुन शालेय मुली सहभागी झाल्या होत्या. मुलगी शिकली प्रगती झाली.
स्त्री शिक्षणाचा दिवा लावा घरोघरी… तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमले. या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. सादर करण्यात आलेल्या लेझीमच्या डावाने उपस्थितांची मने जिंकली. तर घोड्यांच्या रथामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
या रॅलीचे अभेद्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते, अनिल पालवे, वैभव शिंदे, गणेश औसरकर, निळकंठ विधाते आदिंसह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. सारसनगर परिसरातून मार्गक्रमण होवून सदर रॅलीचे कै.दामोधर विधाते विद्यालयात समारोप झाला. यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन निरंतर शिक्षण विभागाचे सहा. अधिकारी संजय मेहेर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाले. यावेळी संस्थेचे विश्‍वस्त बाळासाहेब विधाते, रामदास कानडे, सरचिटणीस प्रा.शिवाजी विधाते, ज्ञानदेव पांडुळे, मुख्यध्यापक शिवाजी म्हस्के आदि उपस्थित होते.
 प्रास्ताविकात योगेश दरवडे यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवा निमित्त शाळेत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे सादर केली. संजय मेहेर म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.