संगमनेरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना केली सहा रुपयांची मनिऑर्डर!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याच्या ५१ गोण्यांना अत्यल्प भाव मिळाला. कांद्याच्या दरात दररोज होत असलेल्या घसरणीचा फटका बसल्याने तालुक्यातील अकलापूर येथील शेतकऱ्याने हाती आलेल्या सहा रुपयांची मनिऑर्डर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली. 


Loading...
अकलापूर येथील श्रेयस आवाळे यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने दोन एकर कांद्याचे पीक घेतले. त्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रयोग करत अडीच लाख रुपये खर्च केले. शेतात डौलदार पीक दिसू लागले. मोठ्या कष्टाने घेतलेल्या या कांद्याला चांगला भाव मिळेल, ही त्याची अपेक्षा मात्र फोल ठरली. 

कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकरी अडचणीत आला असून मातीमोल दराने कांदा विकण्याची वेळ त्याच्यावर आली. कांद्याच्या या वेगवेगळ्या कहाण्या समोर येत असतानाच गुरुवारी राजापूर येथील एका शेतकऱ्याने बाजार समितीसमोर कांदे ओतत ते फुकट घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. 


त्या पाठोपाठ आता आभाळे यांचा अनुभव समोर आला आहे. आभाळे यांनी गुरुवारी संगमनेर बाजार समितीत आणलेल्या कांद्याच्या गोण्या गगनगिरी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे दिल्या असता त्यांच्याकडील चांगल्या कांद्याला २ रुपये ५१ पैसे, मध्यम कांद्याला ७५ पैसे आणि हलक्या कांद्याला ६३ पैसे किलो भाव मिळाला. 


५१ गोण्या विकून ३ हजार २०८ रुपये त्यांच्या हातात पडले. हा कांदा उतरवण्यासाठी हमाली, वजन करण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, आणि वारई यावर त्यांचे ३२०२ रुपये खर्च झाले. कांदा विक्रीतून त्यांच्या हाती अवघे सहा रुपये शिल्लक राहिल्याने संतापलेल्या आभाळे यांनी या सहा रुपयांची मनिऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.