केडगावच्या 'ह्या' लढतीकडे रहाणार सर्वांचे लक्ष.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगावमधील प्रचार रंगात आला आहे. सर्वांचे लक्ष लागले आहे ते प्रभाग १७ मधील शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते आणि भाजपचे मनोज कोतकर यांच्या लढतीकडे. संपूर्ण केडगावची जबाबदारी दिलीप सातपुते यांच्यावर असताना प्रभाग १७ मध्येच त्यांची कोंडी करण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दिलीप सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 


Loading...
भाजपचे मनोज कोतकर यांची ही दुसरी निवडणूक असल्याने त्यांनी ती प्रतिष्ठेची केली आहे. केडगावमध्ये प्रभाग १६ आणि १७ च्या आठ जागांसाठी तब्बल ३७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत केडगावात होत आहे. पण सर्वांचे लक्ष प्रभाग १७ मधील लढतीकडे लागले आहे. 

अपक्ष पण काँग्रेसने पुरस्कृत केलेले उमेदवार शिवाजी लोंढेही याच प्रवर्गातून आपले नशीब अजमावत आहेत. प्रभाग क्रमांक १७ हा केडगाव बायपास ते नगर-दौड रोड हनुमाननगर व परिसर व केडगाव गावठाणातील काही भाग असा मोठा विस्तारित आहे.


दिलीप सातपुते यांच्याकडे संपूर्ण केडगावमधील शिवसेनेच्या आठही उमेदवारांची जबाबदारी असली, तरी त्यांची त्यांच्याच प्रभागात कोंडी करण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहे. 

सातपुते यांची ही तिसरी टर्म आहे, यापूर्वी त्यांनी दोन्ही वेळेला शिवसेनेकडून लढत विजय मिळवलेला आहे. पहिल्या वेळेला काँग्रेसचे सुनील रामदास कोतकर यांना, तर दुसऱ्या वेळेस काँग्रेसचे जालिंदर कोतकर यांना त्यांनी पराभूत केले होते. 


आता त्याच कोतकर कुटुंबातील भाजपचे मनोज कोतकर यांच्याशी त्यांची लढत होत आहे. काँग्रेसचे केडगावमधील सर्वेसर्वा भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्या प्रचार नियोजनाशी सामना करत सातपुते यांनी विजय मिळवला होता. 

भाजपचे मनोज कोतकर यांची ही दुसरी निवडणूक आहे. मोठा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. मागील निवडणुकीत अपक्ष असतानाही अवघ्या ४३ मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. 


तो पराभव पचवत त्यांनी पुन्हा जनसंपर्कास सुरुवात केली. निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजपत प्रवेश केला असला, तरी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीचे त्यांना छुपे पाठबळ आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.