राहत्या घरात पत्नीची हत्या करून पतीने केली रेल्वेखाली आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पत्नीची राहत्या घरात हत्या करून पतीने रेल्वेखाली आत्महत्या केली. हा प्रकार तालुक्यातील सिद्धटेक जवळील वडारवाडी येथे घडला. ही माहिती समजताच घटनास्थळी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली. वडारवाडी येथे रमेश गणपत शिंदे व त्याची पत्नी उज्ज्वला हे दोघे रहात. त्यांना अनिकेत व संदेश ही दोन मुले आहेत. 


Loading...
सोमवारी पहाटे रमेशने पत्नी उज्ज्वलाच्या डोक्यात दगड, वीट, कोयत्याचे घाव घालून तिची निर्घृण हत्या केली. नंतर तो फरार झाला. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचे डाग पडले होते. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वडारवाडी येथे मोठी गर्दी केली होती. 

ही माहिती समजताच कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पत्नीची हत्या करण्याचे कारण काय, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काही वेळातच उज्ज्वलाचे वडील व नातेवाईक वडारवाडीला आले. 


शवविच्छेदनासाठी उज्ज्वलाचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या हत्येप्रकरणी उज्ज्वलाचे वडील शांतीलाल मारूती आगवने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, उज्ज्वला भोळसर होती. ती घरात टापटीप ठेवत नव्हती. तिने केलेला स्वयंपाक पतीला आवडत नाही, असे ती माहेरी आल्यावर सांगत असे. 


याच कारणामुळे पतीने तिला ठार मारले असावे. काही वेळानंतर आरोपी रमेश शिंदे याने श्रीगोंदे तालुक्यातील लिंपणगाव शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समजले. पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या का केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.