तुम्हीच ठरवा आपला पाहिजे की तुपला आ.मोनिका राजळे यांचे भावनिक आवाहन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेवगाव जलयुक्त शिवार योजनेत मतदारसंघात झालेले तेरापैकी दहा बंधारे शेवगाव तालुक्यात झाले आहेत. शेवगाव तालुक्याला मी कायम झुकते माप दिले आहे. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की, आपला पाहिजे की तुपला, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. 

Loading...
आखेगाव येथे शेवगाव ते कोरडगाव, दैत्यनांदूर या २ कोटी ५६ लाख खर्चाच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाचा, तसेच जलयुक्त शिवार योजनेतील ३९ लाखांचा बंधारा व जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमी संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ करताना आमदार राजळे बोलत होत्या.

 या वेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, बबन लवाडे, उमेश भालसिंग, भीमराज सांगडे, रामजी केसभट, विष्णू देशमुख, अमोल नलावडे, राजे धुमाळे, शेषराव जवरे, विनायक खेडकर आदी उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, विकासकामांत मी भेदभाव करत नाही. दुष्काळी परिस्थिती असताना विरोधक मोर्चे काढून प्रशासनास वेठीस धरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची घोषणा केल्यानंतर दहा दिवसांनी मोर्चा काढून जनतेची दिशाभूल केली गेली. विरोधकांना शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी टंचाई बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते. परंतु ते पत्रकार परिषद घेऊन जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत.

तालुक्यात पाण्याचे राजकारण होत आहे. विरोधकांकडून गावागावांत दोन गटांत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे. आपले काम, कर्म जर चांगले असले, तर ते लोकांना सांगावे लागत नाही, त्याची लोकांना आपोआप जाणीव होते. 

कोणत्याही कामात मी आपला-तुपला असा दुजापणा केला नसून करणारही नाही. आखेगावकरांचे हक्काचे पिण्याची पाणी चोरून बांधकामासाठी वापरणाऱ्या गटाच्या लोकप्रतिनिधींना जनता चांगलाच धडा शिकवेल, असे आमदार राजळे म्हणाल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.