जामखेड तालुक्यातील घुंगरांचा आवाज होणार बंद, 'त्या' कलाकेंद्रांचे परवाने रद्द. !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऐन दिवाळीच्या दिवशीच जामखेड तालुक्यातील घुंगरांचा आवाज बंद होणार आहे,तालुक्यातील सहा कलाकेंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्यामुळे या कलाकेंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत.
Loading...

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचा मेल आल्याबरोबर तत्काळ त्या आदेशाचे पत्र संबंधित सहा कलाकेंद्रांना दि. ५ रोजी पोच करण्यात आले. मात्र, काही कलाकेंद्रचालकांनी पत्र घेण्यास नकार दिल्याने परवाना रद्द करण्याच्या आदेशाचे पत्र त्या कलाकेंद्राच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे, असे तहसील प्रशासनाने सांगितले. 

जिल्हा प्रशासनाने जामखेडमधील जगदंबा कला केंद्र, झंकार संगीत पार्टी (दिवानखाना), नटराज संगीत बारी (दिवानखाना), घुंगरू सांस्कृतिक कला केंद्र, रेणुका सांस्कृतिक कलाकेंद्र, लक्ष्मी कलाकेंद्र, या सहा वादग्रस्त कलाकेंद्रांचा परवाना रद्द करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. 

सदर कलाकेंद्रांना परवाना देण्याचा अधिकार २००६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असताना जामखेड तहसीलने या कलाकेंद्रांना परवाना कसा दिला, यावर जिल्हा प्रशासनाने आक्षेप घेत तहसीलने दिलेले परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. 

अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचा आरोप करत हे कलाकेंद्र बंद करण्यासाठी मोहा ग्रामस्थांनी बीड रोडवरील पाच कलाकेद्रांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. या पाच कलाकेंद्रांमुळे परिसरात अवैध धंदे व गुंडांचे अड्डे बनले होते. आता जिल्हा प्रशासनाने येथील सहा कलाकेंद्रांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मोहा येथील महिला व ग्रामस्थांच्या लढाईला अखेर यश आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.