दिवाळीचा पहिला दिवा लायन्सने प्रज्वलीत केला वृध्दाश्रमात


कुटुंबापासून दुरावलेल्या ज्येष्ठ नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी लायन्सने पहिला दिवा वृध्दाश्रमात लावला. नगर-औरंगाबाद रोड येथील भाऊसाहेब फिरोदिया वृध्दाश्रमात लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन व मिलेनियमच्या वतीने अभ्यंग स्नानांतरयोग कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत रंगलेल्या दिपावली पहाट मध्ये अनेक बहारदार गीतींचे सादरीकरण झाले. लायन्स मिडटाऊन व मिलेनियमच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना उटणे पासून तर फराळ पर्यंन्त सर्व वस्तूंची भेट देण्यात आली. मोठ्या जिव्हाळ्याने दिवाळीचा आनंद द्विगुणीत करीत लायन्स सदस्यांनी दिलेल्या दिवाळी भेटीने वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 

लायन्सचे विभागीय अध्यक्ष महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा राजश्री मांढरे, मिलेनियमचे उपाध्यक्ष हरिष रंगलानी, सचिव शर्मिला पाटील, छाया राजपूत, लायन्स मिडटाऊनचे संस्थापक श्रीकांत मांढरे, हरिष हरवानी, राजकुमार गुरनानी, वृध्दाश्रमाचे अधिकारी डॉ.दिलीप कदम आदींसह लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते. क्लबच्या सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांबरोबर मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

राजश्री मांढरे म्हणाल्या की, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी लायन्सने हा उपक्रम घेतला असल्याचे सांगितले. कार्यक्रमास हेमलता बरमेचा, सुचेता जोशी, वंदना ललवाणी, गीता गुरनानी आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार छाया राजपूत यांनी मानले.
Powered by Blogger.