नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीकडेच रहाणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दक्षिणेची राष्ट्रवादीची जागा उत्तरेतील कोणालाही दिली जाणार नाही. डॉ. सुजय विखेंचे अतिक्रमण रोखण्यासाठी ॲड. प्रताप ढाकणे यांच्या पाठीमागे मी जिल्हाध्यक्ष म्हणून उभा राहील, असे जाहीर बोलून ढाकणेंना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Loading...
गेल्या आठवड्यात पाथर्डी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता, या वेळी राजेंद्र फाळके यांनी जाहीर भाषणातून ॲड. प्रताप ढाकणे यांचे कौतुक केले होते. या वेळी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर टीका करीत जिल्हा विभाजन करण्याचे आश्वासन कुठे गेले, असा सव्वाल केला. 

नगरचे जिल्हा विभाजन केले तर दक्षिणेचा विकास होईल. उत्तरेचे होणारे डॉ. सुजय विखेंचे अतिक्रमण रोखावे लागेल. मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. विखे यांना जागा सोडण्याला माझा विरोध आहे. राष्ट्रवादीच ही जागा लढवेल आणि ॲड. प्रताप ढाकणेंना ते जमेल. मी ढाकणेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील, असे फाळके म्हणाले. त्यामुळे ढाकणे समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

ढाकणे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना उघडपणे बोलून दाखविले आहे. माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. ढाकणेंनी पवारांना साकडं घातलं तर हे उमेदवारीच गणित जुळेल, असा दावा ढाकणे समर्थक करीत आहेत. 

फाळकेंच्या पाठिंब्याने ढाकणेंना पुन्हा चैतन्य मिळाले आहे. ढाकणे लोकसभेची तयारी करीत आहेत. प्रताप ढाकणे यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखाना या वेळी स्वत: चालविण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक करायची आणि राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवायची, असा चंग ढाकणे व त्यांच्या समर्थकांनी बांधला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.