किरकोळ भांडणातून दारुड्या मुलाने जन्मदात्या आईचीच केली हत्या !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दारुड्या मुलानेच आपल्या आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे. नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात शनिवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. छाया बाळू गुंजाळ (वय 50, रा. भावनाऋषी सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर) असेे मयत महिलेचे नाव आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दारू पिण्याचे व्यसन असलेला सागर हा त्याच्या आईसोबत कल्याण रस्ता परिसरात राहतो. त्याच्या घरासमोर बहीण स्वाती राजेंद्र रोकडे या त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहतात. शनिवारी (दि. 3) सकाळी 6 वाजता स्वाती या नेहमीप्रमाणे आईला उठविण्यासाठी गेल्या. त्यांनी आईला बाहेरून आवाज दिला. परंतु, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वाती यांची मुलगी रोहिणी हिने दरवाजाच्या फटीतून आतमध्ये हात घालून कडी उघडली. 

त्यानंतर दरवाजा उघडून स्वाती या घरात गेल्या. त्यावेळी आई पुढच्या खोलीत अंथरुणातच पडलेली दिसली. तिला आवाज दिला. परंतु, ती उठली नाही. जोरजोरात आवाज दिल्यानंतर शेजारी राहणारे लोक खोलीत जमा झाले. सर्वजण मोठ्या आवाजात स्वाती यांच्या आईला उठवत होते. मात्र, त्या उठत नव्हत्या. 

मोठ्याने सुरू असलेल्या आवाजामुळे घरातील पाठीमागील खोलीत झोपलेला सागर गुंजाळ हा बाहेरच्या खोलीत आला. त्यानंतर शेजारी राहणार्‍या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी सर्वांनी छाया गुंजाळ यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी छाया गुंजाळ यांना मयत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केला व त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी उत्तरीय तपासणी केली. वैद्यकीय उत्तरीय तपासणीत छाया गुंजाळ यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. 

त्यानंतर पोलिसांनी परिसरातील रहिवाशी, मयताची मुलगी यांचे जबाब नोंदविले. त्यात छाया गुंजाळ यांचा खून त्यांचा मुलगा सागर गुंजाळ यानेच नेहमीच्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांची मुलगी स्वाती रोकडे हिने फिर्याद देण्यास नकार दिला. 

त्यामुळे पोलिस नाईक चौधरी यांच्या फिर्यादीवरून सागर बाळू गुंजाळ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलगा सागर बाळू गुंजाळ याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून, त्यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 9 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.