भामट्या महिलेला रंगेहाथ पकडून नागरिकांनी दिला चोप !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहुरीच्या आठवडे बाजारात हात सफाई करणाऱ्या भामट्या महिलेला रंगेहाथ पकडून नागरिकांनी चोप दिला. खिसेकापू महिलेला पकडल्याने बाजारात बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान, माहिती देऊनही उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळी न आल्याने या महिलेला नागरिकांनी सोडून दिले. 
Loading...

राहुरी शहरात भरणाऱ्या गुरुवारच्या आठवडे बाजारात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीचा सण जवळ आल्याने आठवडे बाजार सायंकाळी फुल्ल झाला होता. खरेदीसाठी नागरिकांची झालेल्या वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन या महिलेने खरेदीच्या नादात असलेल्या नागरिकाचा खिसा साफ करून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आपल्या खिशातील पैसे चोरी गेल्याचा सुगावा लागताच या नागरिकाने संबंधित महिलेला जागेवर पकडल्याने चोरीच्या घटनेचा भांडाफोड झाला. या महिलेला चोप देताच चोरलेले पैसे संबंधित नागरिकाला परत मिळाले. गेल्या पंधरवाड्यापूर्वी राहुरी बसस्थानकावर बाभळेश्वर व कोल्हार येथून बसलेल्या २ भामट्या महिलांनी प्रवाशाच्या खिशातील ८० हजार रुपयांची रोकड चोरली होती.

या प्रवाशाने खिसेकापू महिलांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेपाठोपाठ गुरुवारच्या आठवडे बाजारात चोरीची घटना घडली आहे. राहुरीचा आठवडे बाजार, बसस्थानक व हात की सफाई हे समिकरण ओळखले जाते. गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापणे, तसेच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणे, खिशातील मोबाइल हातोहात लांबवणे या घटनांचे सत्र राहुरीत सुरूच आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.