बाबांच्या आशीर्वादाने वाचलो,नाहीतर गडावर एकाधिकारशाही आली असती - नामदेव महाराज शास्री .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- १५ वर्षांत लोकांनी भगवानगड मोठा केला. पैसे लोकांनी दिले. पण लोक मानायलाच तयार नाही. विश्वास ठेवल्याने विश्वासघात होतो. आता पुढची पिढी अत्यंत हुशार आहे. गड जायची वेळ आली तेव्हा मला जाग आली. पण बाबांच्या आशीर्वादाने वाचलो; अन्यथा वेळीच दखल घेतली नसती, तर गडावर एकाधिकारशाही आली असती, असा आरोप भगवानगडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांनी केला. 
Loading...

बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महंत शास्री बोलत होते. भगवानगडावर भाषणबंदी केल्यानंतर महंत प्रथमच जाहीर कार्यक्रमात बोलले.

शास्त्री महाराज पुढे म्हणाले, तीन वर्षांत गडाची ताकद कळाली. भाषण केल्याने संपत्ती प्राप्ती आपली होते हे मला समजलेच नाही. आपल्या घरामध्ये केंद्रीय मंत्र्याएवढे पद असताना प्रतापच्या काही नकळत चुका, तर काही गोष्टी काळाच्या ओघात घडल्या. गड जायची वेळ आली तेव्हा मला जाग आली आणि कारखाना जायची वेळ आली तेव्हा त्यांना जाग आली. माझ्या मागे बाबा अन् त्यांच्या मागे बबनराव होते. त्यामुळे या वास्तू वाचल्या.

आपण ज्या घरात राहतो त्या माणसांना घरमालक कळाला, तर त्या घरातील माणसांना समाधान लाभते. आपलं घर आपल्याला कळतं तेव्हा दुसऱ्यांना किंमत द्यायची गरज पडत नाही. मला 'बाबां'ची किंमत माहिती होती. म्हणून गड शिल्लक राहिला; अन्यथा भगवान बाबा शिक्षण प्रसारक संस्थेसारखी गडाची अवस्था झाली असती.

सध्या पाण्याचा दुष्काळ आहे. मात्र, भगवानगडावर पाणी आहे. सबंध परिसर हिरवळीने नटलेला पाहून काही जण जळतात. गडावर आज हिरवळ आहे. पण त्या हिरवळीवर आता राजकीय भाषणबाजी होणार नाही. निव्वळ भाषणबाजी करून गड आपला होत नसतो, असा टोला भगवानगडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता लगावला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.