न्यूयॉर्कमध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरणअहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे न्यूयॉर्क शहरात अनावरण झाले. यावेळी उपस्थित भारतीय व्यापाऱ्यांनी ग्रामीण बचतगटांच्या उत्पादनांना अमेरिकेत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची हमी दिली.
न्यूयॉर्क शहरात गुजराती समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत. याठिकाणी गुजराती व्यापारी संघाच्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांचे काल स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी बोलताना त्यांनी अखंड भारत निर्माण करून भारतात एकता प्रस्थापित करणाऱ्या वल्लभभाई पटेल यांचा भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच असा पुतळा संपूर्ण जगाला एकतेची प्रेरणा देत राहील, असे गौरवोद्गार काढले.

महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उमेद अभियानाची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सर्व न्यूयॉर्कस्थित व्यापारी वर्गाने बचतगटांची उत्पादने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची हमी दिली. गुजराती समाज संघटनेचे अध्यक्ष मनीष पटेल,न्यूयॉर्कमधील भारताचे वाणिज्य राजदूत चक्रवर्ती, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आदी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.