सुरेश हावरे यांची गाडी फोडणाऱ्याना भाजप सडेतोड प्रत्युत्तर देणार!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  समाजकंटकांना हाताशी धरून काँग्रेस नेत्यांनी सुरेश हावरे यांच्या गाडीवर हल्ला घडवून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पण यापुढे असे प्रकार घडल्यास जिल्हा भाजप संबंधितांना सडेतोड उत्तर देईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी स्पष्ट केले आहे.
Loading...

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा निषेध बेरड यांनी केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यापुढे असे प्रकार घडल्यास भाजप सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

प्रा. बेरड यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनतेने जुलमी सत्ता उलथवून राज्यात भाजपचे सरकार आणले आहे. साई संस्थानवरही चांगले काम करणारे विश्वस्त मंडळ आले आहे. त्याचा पोटशूळ स्थानिक काँग्रेस पुढाऱ्यांना उठला आहे. कारण, सरकार व संस्थानने त्यांच्या राजकीय दुकानदाऱ्या बंद केल्या आहेत. दुष्काळाचे कोणतेही राजकारण भाजपने केलेले नाही. 

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिर्डी नगरपरिषदेला विविध विकास कामांसाठी साई संस्थानने ३२१ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय शिर्डीच्या स्वच्छतेसाठी दरमहा ३० लाख रुपयेही दिले जात आहे. शिर्डीच्या विकासात संस्थानचे योगदान असताना केवळ दुष्काळ निवारण कामासाठी मुख्यमंत्री निधीला संस्थानने ५० कोटी रुपये दिल्याचा आकस स्थानिक काँग्रेस पुढाऱ्यांना आहे, असा आरोप प्रा. बेरड यांनी केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.