शिर्डीतून आमदार भाऊसाहेब कांबळेना लोकसभेची लॉटरी लागणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला समजल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा युतीकडे आहेत. या जागा पुन्हा आघाडीकडे मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये जागा बदलाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे. काँग्रेसला नगर दक्षिणेची जागा हवी असली, तरी राष्ट्रवादीला शिर्डी ऐवजी पुणे व औरंगाबादमध्ये जादा रस असल्याने शिर्डीची जागा काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता बळावली आहे. 
Loading...

असे झाले तर शिर्डीतून लोकसभेसाठी श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळत असून त्यांना लोकसभेची लॉटरी लागण्याचे चित्र आहे. दरम्यान युतीकडून येथील उमेदवारीचा तिढा वाढला आहे. 


दरम्यान सन 2008 मध्ये शिर्डी लोकसभा या नावाने उदयास आलेला हा मतदारसंघ आरक्षित झाला. येथील राजकीय इतिहास बघता एक सुरक्षित मतदारसंघ म्हणून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून येथील उमेदवारी मिळविली. त्यांचे राजकीय उपद्रवमूल्य बघता आठवले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर सर्वसामान्य भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला. 

वाकचौरे हे निवृत्त सनदी अधिकारी असल्याने त्यांना सामान्यांच्या प्रश्‍नाची जाण होती. त्यांनी ‘आपला माणूस आपल्यासाठी’ हे ब्रीदवाक्य घेवून कामे केली. लोकप्रियता मिळविली. परंतु सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांनी ऐनवेळी ‘सेने’ ला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसकडून उमेदवारी केली. ही बाब जनतेला रूचली नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 


त्यांचे प्रतिस्पर्धी सदाशिव लोखंडे यांचा 13 दिवसात खासदार होण्याचा विक्रम या शिर्डी मतदारसंघाच्या नावावर आहे. सन 2019 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आघाडीने जिल्ह्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला पुढे आणल्याने नगर दक्षिणेची राष्ट्रवादी काँग्रेसची जागा काँग्रेससाठी सुटण्याची शक्यता बळावली आहे. त्याबदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद व पुणे येथील काँग्रेसच्या जागेवर हक्‍क सांगितल्याने जिल्ह्यातील शिर्डीची जागा काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता आहे. 

शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहिली. तर सोबर उमेदवार म्हणून लौकीक असलेल्या श्रीरामपूरचे आ. भाऊसाहेब कांबळे यांचे शून्य उपद्रवमूल्य हा गुण त्यांच्यासाठी शक्‍तीस्थळ ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध नसून त्यांच्या रूपाने आघाडीची ही जागा पुन्हा काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न होतील. त्यामुळे असे घडले, तर आ. कांबळे यांना त्यांचे नशीब पुन्हा साथ देणार असल्याचे चित्र आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.