थोरात - विखे पाटील यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीच्या निमित्त्याने कॉंग्रेस अंतर्गत आमदार बाळासाहेब थोरात व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेस उमेदवारांनी प्रचारासाठी प्रसिद्ध केलेल्या प्रचारपत्रकावरून थोरात व प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना गायब करण्यात आले आहे. 

Loading...
या दोघांचेही छायाचित्र छापण्यात आलेले नाही. परंतू विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याबरोबर सुपुत्र डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी आमदार अरूण जगताप व आमदार संग्राम जगताप यांची छायाचित्र दिसत आहे.यावरून या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. थोरात व तांबे शहरात फिरकणार देखील नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असली तरी राष्ट्रवादीची आघाडी ही केवळ विखे गटापुरतीच मर्यादित दिसत आहे. थोरात गटाच्या विरोधात बिघाडी झाली असून त्या गटाच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. अर्थात आघाडीची चर्चाच डॉ. सुजय विखे यांच्याबरोबर राष्ट्रवादीने केली आहे.आ.थोरात गटाला बाजूला ठेवून तसेच तांबे यांना कोणत्याही प्रक्रियेत सहभागी न करताच आघाडीची चर्चा झाली. 

तांबे यांना डावल्यात आल्यानंतर थोरात गटाचे कार्यकर्ते अस्वस्थच झाले होते. या निवडणुकीत थोरात गटाचे काही खरे राहिले नाही. हे ओळखून थोरात गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थोरात गटाला बाजूला ठेवले तरच आघाडीची चर्चा अशी अट घातल्यामुळे थोरात गट बाजूला ठेवून विखे गटाला चाल देण्यात आली होती. आघाडीतील चर्चेच्या निमित्ताने डॉ.विखे व आ. जगताप एकत्र आले.

महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार थोरात यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली होती. त्यानंतर या निवडणुकीत समन्वयक म्हणून सत्यजित तांबे यांची नियुक्‍ती केली.

अर्थात तांबे यांना ती संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्यांना समन्वय साधण्यापूर्वीच निवडणूक प्रक्रियेतून बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे ते नगरला फिरकले नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तांबे व आ. जगताप एकमेकांच्या समोरासमोर लढले. त्यात तांबे यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून तांबे व आ. जगताप यांचे पडले नाही.

मागील महापालिका निवडणुकीत विखे व थोरातांनी एकत्रिपणे कार्यकर्त्यांना बळ दिले होते. त्यामुळे 11 जागा मिळाल्या होत्या. आता या निवडणूक प्रक्रियेतून आ. थोरात यांना बाजूला ठेवण्यात आले आहे की ते बाजूला राहिले. त्यामुळे एकट्या विखेंना निवडणुकीची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

कॉंग्रेस उमेदवारांनी प्रचारासाठी प्रचारपत्रक प्रसिद्ध करून ते मतदारांपर्यंत पोहचविण्यास सुरूवात केली आहे. परंतू त्या प्रचारपत्रकावर आ. थोरात व तांबे यांची छबीच गायब करण्यात आली आहे. सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, आमदार अरूण जगताप व दोन्ही बाजूने डॉ. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीची सर्व जबाबदारी डॉ. विखे यांच्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येणार आहे. म्हणजे आ. थोरात व तांबे हे प्रचारासाठी शहरात फिरकणार नाहीत. असा त्यांचा अर्थात होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.