मुळा धरणातून वीजनिर्मितीस प्रारंभ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या केंद्रातून वीज निर्मितीस प्रारंभ झाला आहे. मुळा धरणाच्या अत्यल्प पाणीसाठ्याचा परिणाम वीज निर्मितीवर सध्या होत असून दररोज चार मेगावॅट वीज ‘कामदार’ या कंपनीकडून महावितरणला पुरविली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आघाडी शासनाच्या काळात मुळा धरणावर वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. तब्बल 4 वर्षे विजनिर्मिती प्रकल्पाच्या निर्मितीचे काम सुरू होते. 
Loading...

दोन वर्षांपूर्वी काम पूर्ण झाले. धरणावर वीज निर्मितीचा ठेका पुणे येथील ‘कामदार’ इंडस्ट्रिजला देण्यात आला होता. त्यानंतर मुळा धरणावर विजनिर्मिती सुरू करण्याबाबत पाटबंधारे विभागाकडून हिरवा कंदिल दर्शविण्यात आला. त्यानंतरही या वीज निर्मिती प्रकल्पाला अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अखेरीस पुणे येथील ‘कामदार’ इंडस्ट्रिजने सर्व अडचणींवर मात करत नुकताच वीज निर्मितीस प्रारंभ केला. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली. 


त्यामुळे मुळा धरणात अत्यंत कमी पाणीसाठा जमा झाला. केवळ 19 टिएमसी पाणी शिल्लक असताना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याला किमान दोन आवर्तनांचा निश्‍चित लाभ होईल व वीज निर्मिती प्रकल्पातून अधिक वीज निर्मिती होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शासनाकडून समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या अनुषंगाने जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून दोन टिएमसी पाणी गेल्यानंतर धरणात केवळ 16 टिएमसी पाणी शिल्लक राहिले होते. 


कालवा सल्लागार समितीने मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत डाव्या व उजव्या कालव्यासाठी केवळ एकच आवर्तन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तात्काळ धरणातून उजव्या कालव्याचे आवर्तन सोडण्यात आले असून 1 हजार 299 क्यूसेक प्रवाहाने शेतकर्‍यांपर्यंत 400 दलघफू पाणी आजपर्यंत पोहोचले आहे. डाव्या कालव्याचे आवर्तन 300 क्यूसेक वेगाने सुरू असून त्यासाठी 578 दलघफू पाणी खर्च झाले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.