गोळीबारात ठार झालेल्या तरुणावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या योगेश जाधव या तरूणावर रविवारी रात्री आठ वाजता कडक पोलिस बंदोबस्तात कामत शिंगवे (ता.पाथर्डी) येथे त्याच्या घराजवळ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी पोपट आदमाने याने योगेशवर घरात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्याने त्यातच योगेशचा जागीच मृत्यू झाला. 


Loading...
शनिवारी योगेशचा मृतदेह नगरला उतरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. परंतु पोलिस प्रशासनाने पुणे येथे उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याने मृतदेहाची पुणे येथे शवविच्छेदन केल्यानंतर, रविवारी रात्री मृतदेह पुण्याहुन थेट कामत शिंगवे येथे आणून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मात्र नातेवाईकांचा मोठा आक्रोश येथे पहायला मिळाला. त्याच्यावर अत्यंत शोकाकूल परंतु तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगर येथे रूग्णालयात उपचार घेत असलेले योगेश याचे वडील एकनाथ जाधव व भाऊ अक्षय जाधव यांना देखील अंत्यविधीसाठी रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. अंत्यविधीदरम्यान शीघ्रकृती दल, एसआरपी, राज्य सुरक्षादल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा व वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. योगेशवर गोळ्या झाडून त्याची भरदिवसा हत्या करणारा आरोपी पोपट आदमाने याच्यादेखील डोक्याला जबर मार लागल्याने नगर येथील खाजगी रग्णालयात उपचार घेत आहे. घटनेत घरात अक्षरषा रक्ताचा सडाच पडलेला होता. या हत्या प्रकरणामुळे जवखेडे खालसा येथे झालेल्या हत्याकांडाच्या आठवणी जाग्या झाल्या असून, या परिसरातील लोकांकडून एकमेकांमध्ये फोनवर बोलतांना देखील सावध भूमिका घेतली जात आहे.

बहिणीच्या आक्रोशामुळे उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

योगेश याची बहीण दिपालीचा आक्रोश मात्र उपस्थितांचे मने हेलावून टाकणारा होता. कारण तीचा दि.१८ डिसेंबरला विवाह ठरलेला आहे. तिच्या लग्नसोहळ्याची घरात तयारी सुरू असतांनाच हा कटू प्रसंग जाधव कुटूंबावर ओढवला आहे. त्यातच दिपालीच्या आक्रोशामुळे उपस्थितांच्या देखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

ते वाढून ठेवलेले जेवणाचे ताट पाहुन राहिले तसेच.

योगेश याचे वडिल आणि भाऊ जेवणासाठी दुपारी घरात बसले. समोर जेवणाचे ताट देखील आले होते. परंतु याचवेळी आरोपी आदमाने याने घरात घुसून कॉटवर बसलेल्या योगेशवर गोळी झाडली. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. रविवारी देखील घरातील ते वाढून ठेवलेले जेवणाचे ताट पाहुन अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.