श्रीगोंद्यात शिक्षिकेच्या विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथील श्रीभानेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापकावर शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. 

Loading...
या शाळेतील मुख्याध्यापक व काही शिक्षक अनेक वर्षांपासून महिला शिक्षकांना त्रास देत असल्याची तक्रारी गटशिक्षणाधिकारी व शिक्षण संस्थाचालकांकडे गेल्या होत्या. तथापि, या तक्रारींची कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व शिक्षिका त्यांच्या कक्षात व शिक्षक त्यांच्या कक्षात बसले होते. 

तेवढ्यात शिक्षकांच्या कक्षातून मोठ्याने आवाज येऊ लागला. आवाज कोणाचा येतोय, हे पाहण्यासाठी शिक्षिका गेल्या असता तेथे दोन शिक्षकांमधील चालू असलेला वाद मुख्याध्यापक व्ही. जी. शेलार हे आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होते. 

शिक्षिका त्यांना म्हणाल्या, मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यापेक्षा त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करा. याचा राग मुख्याध्यापक शेलार यांना आला. त्यांनी महिलेस हाताला धरून ढकलले. अन्य शिक्षिका मध्यस्थी करू लागल्या असता त्यांनाही मुख्याध्यापक शेलार व शिक्षक एस. टी. कारंडे, एस. व्ही. चौधरी यांनी अर्वाच्च शिवीगाळ करून गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून घेतले. 

काही वेळातच गावातील मंडळी शाळेत आली. त्यांनी शिक्षकांना दमदाटी आणि शिवीगाळ केली. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक शेलार यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.