कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हैराण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कांद्याचे भाव गडगडल्याने साठवून ठेवलेल्या कांद्याचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत . गतवषी या परिसरावर निसर्गाने चांगली कृपादृष्टी दाखविल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली.
Loading...

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी उत्पादन मिळवून देणाऱ्या कांद्याची लागवड मोठया प्रमाणात केली. उत्पादनही चांगले झाले परंतु बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. 


निसर्गाने साथ देऊनही कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने तो मातीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे.. शेतमालाला हमी भाव मिळावा याबाबतची मागणी अनेक वेळा सरकार दरबारी केली. दोन वेळा संपही पुकारला, परंतु मायबाप सरकारला, शेतात घाम गाळून रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याची मात्र अद्याप दया आलेली नाही. त्यामुळे त्याला कुणीच वाली उरलेला नाही असे म्हणावे लागेल. 


कारण त्याने स्वत: कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचा भाव तो ठरवू शकत नसल्याने त्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे.शेतीसाठी लागणारी औजारे, खते, बी -बियाणे, यांत्रिक व इतर साधने यांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. परंतु त्याच्या मालाची किंमत वाढण्याऐवजी घसरतच चालल्याने त्याची खूप मोठी आर्थिक व कौंटुबिक वाताहात होत असल्याने अनेकजण हा त्रास सहन न झाल्याने व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महतेचा मार्ग स्वीकारत आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.