शेतकऱ्यांनी नाशिक-पुणे मार्गावर फेकले कांदे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खर्च १४० रुपये आणि भाव १०० रुपये.त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेल्या कांद्याच्या गोण्या गुरुवारी रात्री नाशिक-पुणे मार्गावर आेतल्या. शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर टाकल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. तहसीलदार आणि पोलिसांनी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाची मदत घेत रस्ता वाहतुकीस मोकळा केला. 

अकोले तालुक्यातील गणोरे येथील भाऊपाटील जयराम आंबरे, गणेश काशिनाथ आंबरे, मंगेश रामदास आंबरे व प्रवीण विलास आंबरे यांनी त्यांच्याकडे असलेला लाल कांदा संगमनेरच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. गेल्या आठवड्यात या कांद्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाला होता. या वेळी मात्र हा दर थेट शंभरवर आल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी हा कांदा महामार्गावर आणून आेतला. पंचवीस गोण्या कांदा रस्त्यावर फेकल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

वाहने त्यावरूनच जाऊ लागल्याने या कांद्याचा लगदा झाला. उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी संतापले होते. गोण्या, गाडीभाडे, हमाली, तोलाई असा सर्व खर्च एकत्रित केला, तर तो १४० रुपये होत होता आणि त्याच कांद्याला शंभर रुपये भाव मिळत असल्याने त्यांनी कांदा रस्त्यावर फेकण्याचा निर्णय घेतला होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.