नगरसेवक व शहराध्यक्षांत भर रस्त्यात खडाजंगी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरात गुरुनानक जयंती मिरवणुकीत नगराध्यक्षांसमोरच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने नगरसेवक व माजी नगरसेवकास उद्देशून चक्क चोर म्हटल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त नगरसेवक व या शहराध्यक्षांत नगरपालिकेसमोर भर रस्त्यात खडाजंगी झाली. उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर नंतर पडदा पडला. 
Loading...

याबात सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी गुरुनानक जयंतीनिमित्त शीख व सिंधी समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक पालिकेसमोर आल्यावर नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी गुरुनानकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

 या वेळी नगरसेवक राजेश अलघ, राजेंद्र पवार, ताराचंद रणदिवे, हेमा गुलाटी, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, सिद्धार्थ मुरकुटे, योगेश जाधव, कलिम कुरेशी आदी उपस्थित होते. छायाचित्र काढण्यासाठी सर्वजण प्रतिमेसमोर उभे राहिले. मात्र, सेठी न आल्याने नगराध्यक्ष आदिक यांच्यासह इतरांनीही त्यांना येण्याची विनंती केली. दोन-तीन वेळा म्हटल्यानंतरही सेठी छायाचित्र काढण्यास तयार नव्हते.

 खूप आग्रह केल्यानंतर मी चोरांसमवेत फोटो काढत नाही, असे सेठी गुलाटी व अलघ यांना उद्देशून म्हणाले. त्यामुळे संतापलेल्या अलघ यांनी सेठी यांना चांगलेच सुनावले. रणदिवे व इतर लोकही अलघ यांच्या मदतीला धावून गेले. सेठी व त्यांच्यात वादावादी झाली. एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत प्रकरण गेले. धार्मिक कार्यक्रमात गालबोट नको, म्हणून काहींनी मध्यस्थी करत हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला. 

अलघ, गुलाटी व सेठी हे राजकीय विरोधक आहेत. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले अलघ व गुलाटी हे गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे गटाकडून निवडून आले. मात्र, सत्ता आल्यानंतर दोघांनीही आदिक गटास पाठिंबा दिला. 

सेठी सुरुवातीला राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या, तर नंतर अनुराधा आदिक यांच्या गटाकडून निवडणूक लढले. सेठी यांचा राष्ट्रवादीकडून लढून पराभव झाला. याचे कमी परंतु विरोधात लढूनही अलघ व गुलाटी यांना आदिक यांनी जवळ केल्याचे शल्य त्यांना अधिक टोचत होते. हे दुःख त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्याचा परिणाम या घटनेत दिसून आला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.