राजकीय भूकंपानंतर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावात भारतीय जनता पक्षाने केलेल्या राजकीय खेळीमुळे कॉंग्रेसपुरती घायाळ झाली आहे. या राजकीय भूकंपाची झळ भारतीय जनता पक्षालाही बसू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही झळ बसली नसल्याचा दावा करत असला, तरी त्यालाही हे हादरे बसले आहे. या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. 


Loading...
या राजकीय भूंकपाने शहरातील विखे गट सुन्न झाले आहे. यातून सावरण्यासाठी सुरूवातीपासून अलिप्त राहिलेला थोरात आणि तांबे गट आता काहिसा सक्रिय झाला आहे.प्रभागनिहाय चार अपक्ष उमेदवारांना एकत्र करत विकास आघाडीची रणनीती सुरू केली आहे. या पॅटर्न काहीसा चर्चेत असून त्याला चळवळीचे रूप देता यासाठी थोरात गटाचे जुने-जाणते कार्यकर्ते सक्रिय झाले आहे. 

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे सूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे राज्यपातळीवर नेत्यांनी दिली. डॉ. विखे पाटील यांच्याकडे सूत्र जाताच थोरात आणि तांबे गटाने काहीसा अलिप्तचे धोरण स्वीकारले. डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या चर्चा सुरू केल्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवस अगोदरपर्यंत ही चर्चा सुरू होती. शेवटी 40-22 असा पॅटर्न ठरला. असा हा चित्रविचित्र पॅटर्नमुळे कॉंग्रेसमधील जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या. हा पॅटर्नमागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी चर्चा सुरू होती. तोच केडगाव येथील कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवकांसह पदाधिकारी भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झाले. महापालिकेच्या निवडणुकीतच हा राजकीय भूकंपाने कॉंग्रेससह डॉ. विखे गट, थोरात गट, कॉंग्रेसचे राज्यपातळीवर नेते, स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. यातून अजूनही कॉंग्रेस सावरलेली नाही. 

या राजकीय भूकंपावर विश्‍लेषणासाठी कॉंग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होऊ लागल्या आहेत. या बैठकांमधून काहीच आऊटपूट मिळत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुरते हैराण झाले आहे. या निवडणुकीत पहिल्यापासून आमदार बाळासाहेब थोरात आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे गट अलिप्त राहिला होता. या अलिप्त राहण्यामागचे कारण आताशी उलगडू लागले आहे. 


थोरात गटाच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्ते हा भूकंपाचा मुकाबला करण्यासाठी सरसावले आहे. जाहीर असे कार्यक्रम न घेता छुप्यापद्धतीने कामाला सुरूवात केली आहे. थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी अपक्षांना बळ देण्याची रणनीती आखली आहे. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे डावलेले कॉंग्रेसचे कार्यकर्ते देखील आहेत. अपक्षांना बरोबर घेऊन प्रभागनिहाय विकास आघाडीची रणनीती आखत आहेत. काही प्रभागांमध्ये यश आले आहे. काही प्रभागांमधील अपक्षांबरोबर चर्चा चालू आहे. या चर्चा मॅरेथॉनपद्धतीने होत आहेत. 


प्रभाग 11, 10 आणि चारमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यात प्रभाग 11ने आघाडी घेतली आहे. आघाडीमध्ये प्रभाग 11 मध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे तिथे उमेदवार सलीम जरीवाला, अनिकेत रासकर, कल्पना भंडारी व प्रीती पंचमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून कॉंग्रेस अपक्ष विकास आघाडी स्थापन केली आहे. 


केडगावमधील राजकीय भूकंपनांतर हाच पॅटर्न सर्वत्र राबविता येतो का, याचीही चाचपणी काही कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या पॅटर्नला चळवळीचे रूप देण्याचे प्रयत्न थोरात गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाला आहे. यासाठी भिंगारसह उपनगरातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.